कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांचा मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच लोकार्पण सोहळा : आमदार राजेश क्षीरसागर

Spread the news

कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांचा मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच लोकार्पण सोहळा : आमदार राजेश क्षीरसागर
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत कामांचा आढावा
कोल्हापूर, दि.०५ : गेल्या अनेक वर्षात महायुतीच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्यमंत्री व सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिवंगत उपमुख्यमंत्री कै.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शहराला कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीच्या माध्यमातून पूर्णत्वास येत असलेल्या विकास कामांचे लोकार्पण तसेच प्रस्ताविक कामांचा शुभारंभ लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त दि.२६ जून  करण्याचा आमचा मानस आहे. त्याअनुषंगाने सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही सर्व कामे उच्च दर्जाची ठेवून वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यासर्व कामांचा आढावा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे सादर करून त्यांच्या हस्ते या कामांचे लोकार्पण करून राजर्षी शाहू जयंतीदिनी कोल्हापूरकरांना ही मोठी विकास भेट देता येईल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर शहरातील कोट्यवधी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी विकासकामांचा लोकार्पण सोहळा येत्या २६ जून रोजी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्याचा महायुती शासनाचा मानस आहे. यामध्ये प्रामुख्याने रंकाळा तलाव येथील म्युझिकल फौंऊटेन, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, गांधी मैदान जलनिस्सारण प्रकल्प, शहरातील शाहूकालीन तालीम संस्थांच्या पुर्नबांधणी केलेल्या इमारती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, सरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्किंग इमारत, १०० ई बसेस, अमृत योजनेतून बसविण्यात आलेले एस.टी.पी. प्लांट आदी पूर्णत्वास येत आहेत. या कामांचा लोकार्पण सोहळा यासह पूरनियंत्रण प्रकल्पाचा पहिला टप्पा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर,  श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, राजर्षी शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक या कामांचा उद्घाटन सोहळा समाविष्ठ आहे. या विकास कामांमुळे कोल्हापूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असून, नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. येत्या २६ जून रोजी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त किंवा ८ ऑगस्ट या रंगकर्मी दिनानिमित्त मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांची वेळ घेवून लोकार्पण व उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात येईल, अशी माहिती दिली.
चौकट :
श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात भुयारी मार्ग प्रकल्पाचे आराखडे समाविष्ठ करा : आमदार क्षीरसागर यांच्या सूचना
कोल्हापूर शहरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे पुढील काळात भाविक व पर्यटकांची संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. यामुळे शहरातील वाहतुकीवर याचा विपरीत परिणाम होणार आहे. याची पूर्वखबरदारी घेणे आवश्यक असून, आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिरापर्यंत आणि शिवाजी स्टेडियम ते उड्डाणपूलापर्यंत भुयारी मार्ग उभारणे आवश्यक आहे. या भुयारी मार्ग प्रकल्पाचा मुख्य उद्देश मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी पूर्णपणे सोडवणे आणि भाविकांना सुरक्षित दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देणे हा आहे. या महत्त्वाकांक्षी भुयारी मार्ग प्रकल्पामुळे श्री अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. त्यामुळे भुयारी मार्गाचा आराखडा तयार करून तीर्थक्षेत्र आराखड्याच्या दुसऱ्या टप्पात याचा समावेश करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी विजय राठोड यांना दिल्या.
या बैठकीस जिल्हाधिकारी विजय राठोड, मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, शहरअभियंता रमेश मस्कर, सा.बा.विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.मिरजकर, उपअभियंता इंगवले, मनपा प्रकल्पअधिकारी सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!