कोल्हापूर शहरवासीयांच्या माथी मारलेल्या टोलची ७५० कोटींची रक्कम सतेज पाटील यांच्यावर ओवाळणी करून महायुती शासनाने भागविली : आमदार राजेश क्षीरसागर यांचा खोचक टोला*

Spread the news

*कोल्हापूर शहरवासीयांच्या माथी मारलेल्या टोलची ७५० कोटींची रक्कम सतेज पाटील यांच्यावर ओवाळणी करून महायुती शासनाने भागविली : आमदार राजेश क्षीरसागर यांचा खोचक टोला*

­

 

*१०० कोटींमधून पूर्णत्वास आलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी दरम्यान; सत्ता नसल्याने माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचा जळफळाट होत असल्याचे आमदार क्षीरसागर यांचे वक्तव्य*

  •  

कोल्हापूर दि.११ : कोल्हापूर शहराच्या विकासासाठी महायुती कटिबद्ध व सक्षम आहे. १०० कोटींच्या रस्त्यांवरून विरोधकांची होणारी टीका ही लोकामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि त्यांची अकार्यक्षमता झाकण्यासाठीच आहे. १०० कोटींमधून होणारऱ्या प्रमुख १६ रस्त्यांचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. याबाबत नागरिक समाधानी आहेत. पण, यामुळे विरोधक असमाधानी आहेत. गेल्या सहा महिन्यात घेतलेल्या मॅरेथॉन बैठका, अधिकारी व ठेकेदारांवर अंकुश ठेवून करण्यात आलेले दर्जेदार काम विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे. ज्यांनी २२० कोटींचा आय.आर.बी.चा टोल कोल्हापूरवासीयांच्या माथी मारला. टोलची पावती फाडून कोल्हापूरकरांच्या लढ्याचा अवमान केला. त्यांच्यांवर ७५० कोटींची रक्कम ओवाळणी करून महायुती शासनाने कोल्हापूरवासीयांच्या मानगुटीवरचे टोलचे भूत गाडले, ते काय आमची हत्तीवरून मिरवणूक काढणार, असा खोचक टोला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांना लगावला.

नगरविकास विभागाकडून मंजूर झालेल्या १०० कोटी निधीतून पूर्ण झालेल्या बेलबाग परिसरातील रस्त्यांची पाहणी आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. यावेळी रस्त्यांच्याबाबतीत काही सूचना त्यांनी महापालिका अधिकारी व ठेकेदारास केल्या.

याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले कि, ज्यांनी इतकी वर्षे राज्यात आणि महानगरपालिकेत सत्ता भोगली त्यांनी शहरासाठी काय दिवे लावले. प्राथमिक सोयीसुविधाही ते कोल्हापूरला देवू शकले नाहीत. परंतु, महायुती सरकार या सुविधा निर्माण करत आहे. नागरिक यातून समाधान व्यक्त करत आहेत. नागरिकांची खड्यांच्या रस्त्यातून मुक्तता व्हावी यासाठी आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. निधी आणून रस्ते सुसज्ज केले. प्रमुख रस्ते तर झालेच पण गल्लीबोळातील रस्तेही खड्डेमुक्त केले. विरोधकांना काय दिसते हे मला माहित नाही पण निश्चितच त्यांना महायुतीची सत्ता दिसते. कारण त्यांच्याकडून सत्ता गेल्यामुळे त्यांना जळफळाट होत आहे. विरोधकांनी सत्ता भोगताना जनतेसाठी काय केले हे जाहीर कराव. त्यांनी फक्त स्वत:चे कॉलेज, हॉस्पिटल, हॉटेल्स, संस्था मोठ्या केल्या पण याउलट मी एकही संस्था काढली नाही कि हॉटेल, कॉलेज बांधले नाही. लोकांची सेवा करण्याचा निस्वार्थी प्रयत्न आम्ही करत असून, त्यामुळे कोल्हापूरची जनता नेहमीच महायुतीच्या पाठीशी उभी राहिली आहे. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्वत: थेट पाईपलाईनच्या पाण्याने अंघोळ केली पण त्या योजनेचा लाभ सर्वसामन्य नागरिकांना होताना दिसत नाही, याचा प्रथम त्यांनी खुलासा करावा. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना न्याय देण्यासाठी महायुती सक्षम आहे. खंडपीठ, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, कन्व्हेन्शन सेंटर, रंकाळा तलाव सुशोभिकरण, पूरनियंत्रण प्रकल्प, आय.टी.पार्क ही कामे प्रगतीपथावर आहेत. हद्दवाढ ही होणार आहे. पण, विरोधकांना जनतेने घरी बसविल्यामुळे फक्त विकासाला विरोध करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणतेही काम शिल्लक नसल्याचीही टीका आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.

*चौकट :*

*शक्तीपीठ महामार्ग सतेज पाटील यांच्या घरावरून जातोय काय? : आमदार क्षीरसागर*

यावेळी प्रसिद्धीमाध्यमांच्याकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, शक्तीपीठ महामार्ग आमदार सतेज पाटील यांच्या घरावरून जातोय काय? मला वाटत नाही त्यांच्या घरावरून जात असेल. त्यामुळे त्यांनी फक्त राजकीय विरोधासाठीच शेतकरी बांधवांची दिशाभूक करण्याचे काम सुरु केले आहे. महाराष्ट्र राज्याएवढे क्षेत्रफळ असणाऱ्या अनेक प्रगत राष्ट्रात हजारो किलोमीटरचे महामार्ग आहेत. त्यामुळे तेथील दळणवळण क्षमता विकासास कारणीभूत ठरत आहे. पण, हा महामार्ग होताना विरोधक राजकीय हेतूनेच विरोध करत आहेत. आजपर्यंत कॉंग्रेसने “गरिबी हटाव” चा नारा देत सर्वसामान्य, शेतकरी, गोरगरीब बांधवांना कधीच मोठे होवू दिले नाही. इन्फ्रास्ट्रक्चर न केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठा मर्यादित राहिल्या. समृद्धी महामार्गाला विरोध झाला पण आज ५ तासात शेतकरीबांधवांचा शेतीमाल मुंबई सारख्या मोठ्या शहरातील बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. त्यामुळे शक्तीपीठ हा शेतकरी बांधवांच्या फायद्याचाच महामार्ग आहे. यामध्ये अनेक शक्तीस्थळे, बंदरे, प्रमुख शहरे, बाजारपेठां जोडल्या जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता आय.टी.पार्क, एम.आय.डी.सी., तीर्थक्षेत्र विकास आराखडा आदी प्रमुख प्रकल्प होणार असल्यामुळे या सर्वांना हा महामार्ग जोडला जाणार आहे. पण, सत्ता नाही, काही काम नाही म्हणून शक्तीपीठला विरोध करण्याचे काम विरोधकांकडून सुरु असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रणजित मंडलिक, माजी नगरसेवक किरण नकाते, संतोष महाडिक, जेष्ठ शिवसैनिक जयवंत हारुगले, शहरसंघटक हर्षल सुर्वे, समन्वयक कमलाकर जगदाळे, गिरीश साळोखे, उपशहरप्रमुख राजू पाटील, सचिन पाटील, विभागप्रमुख गजानन भुर्के, श्रीकांत मंडलिक, राहुल चव्हाण, किरण अतिग्रे, सागर शिंदे, विकास शीरगावे, बाळासो मंडलिक, करण पाटील, दिगंबर आपटे, प्रशांत मंडलिक, सौरभ हारुगले आदी उपस्थित होते.

 

वरील बातमी प्रसिद्धीस देवून सहकार्य करावे, ही विनंती.
आपला,
नंदू सुतार,
स्वीय्य सहाय्यक तथा कार्यालयप्रमुख, शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, कोल्हापूर.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!