खाजगी प्राथ . शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अन्यत्र समायोजन नको :शिक्षण मंत्री नाम .दादा भुसे यांच्याकडे मागणी
कोल्हापूर .राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या लिपिक व सेवक यांचे माध्यमिक शाळा किंवा शासनाच्या इतर विभागांमध्ये समायोजन करू नये .त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत आहे त्या शाळेतच ठेवावे अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी शिक्षण मंत्री नाम . दादा भुसे यांचे कडे केली आहे .याबाबतचे निवेदन त्यांना देण्यात आले
खाजगी प्राथ . शिक्षक सेवक समितीच्या वतीने शिक्षण मंत्री नाम .दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी खाजगी प्राथमिक शाळेतील सध्या कार्यरत लिपिक व सेवक यांना तात्काळ माध्यमिक शाळा किंवा इतर विभागांमध्ये समायोजित करण्याचे आदेश काढलेले आहेत . तथापि खाजगी शाळा सेवा शर्ती नियमावली 1981 मधील तरतुदीनुसार खाजगी प्राथमिक शाळांच्या मध्ये लिपिक व सेवक ही पदे भरलेली आहेत व सध्या कार्यरत असलेलेहे कर्मचारी नियमाने कायम झालेले आहेत आरटीई २००९ लागू झाला तेव्हा खाजगी प्राथमिक शाळांच्यासाठी ही पदे देय केली नाहीत . वास्तविक पाहता प्राथमिक शाळेमध्ये शिशु ते चौदा वर्षापर्यंतच्या बालकांना शिक्षण दिले जाते . या मुलांसाठी स्वच्छतागृहे ,शालेय पोषण आहार , पिण्याचे पाणी खेळाचे मैदान , आपात्काल सेवा ‘प्रथयोपचार व्यवस्था व प्रशासकीय कामे यासाठी प्राथमिक शाळांच्यामध्ये लिपिक व सेवक यांची नितांत गरज असते . पण या बाबीकडे दुर्लक्ष करून ही पदे व्यापगत केलेली आहेत हे चुकीचे आहे . महाराष्ट्र शासनाने खाजगी प्राथमिक शाळांच्या मध्ये सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांना सेवानिवृत्तीपर्यंत अभय देऊन त्यांच्या सेवा आहे त्या शाळेत कायम केलेल्या होत्या .तथापि 17 एप्रिल च्या आदेशामुळे स्थानिक अधिकारी त्यांचे अन्यत्र समायोजन करीत आहेत . हे समायोजन थांबवावे व ही पदे व्यापगत करू नयेत अशी मागणी या निवेदनाद्वारे शिक्षण मंत्री नाम दादा भुसे यांचेकडे केलेली आहे .
अशाच प्रकारची निवेदने राज्याचे शिक्षण सचिव रणजीतसिंह देवल ,शिक्षण आयुक्त एस . पी . सिंग व शिक्षण संचालक शरद गोसावी यांना देऊन त्यांनी स्थानिक प्रशासनाला समायोजनाची प्रक्रिया थांबवण्याचे निर्देश द्यावेत अशा प्रकारची मागणी या निवेदनामध्ये केल्याचे समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी सांगितलेले आहे .




