शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराप्रश्नी पुणे शिक्षण संचालकांसमवेत बैठक घेणार
आमदार जयंत आसगावकर यांची कोल्हापूर मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत माहिती
कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार विविध कारणामुळे थकलेले आहे. यासाठी सोमवार, दिनांक 20 एप्रिल रोजी पुणे शिक्षण संचालकांसमवेत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती आमदार जयंत आसगावकर यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या थकित पगाराबाबत सोमवारी कोल्हापूर मुख्याध्यापक संघात बैठक पार पडली. या बैठकीत आमदार जयंत आसगावकर यांनी ही माहिती दिली.
आमदार जयंत आसगावकर यांनी बैठक चालू असतानाच संचालक महेश पालकर यांच्याशी शुभ्रमणध्वनीवरून थकीत पगाराबाबत चर्चा केली. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शून्य शिक्षकी झालेल्या शाळा, प्रयोगशाळा व ग्रंथपाल सहाय्यक यांचे झालेले उन्नयन, शून्य पटाखालील शाळा यांच्या पगाराबाबत 20 एप्रिल रोजी शिक्षण संचालकांसमवेत बैठक घेण्याचे ठरले. यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर म्हणाले, शासन स्तरावर कोणताही आदेश नसताना संचालक किंवा शिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळांची पगार बिले फॉरवर्ड होत नसणे, ही बाब गंभीर आहे. शाळेतील कार्यरत मुख्याध्यापकाचे पद संरक्षित करण्याचे आदेश यापूर्वी निघाले आहेत; परंतु शासन त्यांना पुन्हा अतिरिक्त ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे शाळेच्या प्रशासनावर व गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. मराठी शाळा वाचविण्याबरोबरच शासनाचा हा डाव मोडून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठक झाल्यानंतर आमदार जयंत आसगावकर यांनी कोल्हापूर शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून महावीर कॉलेज येथे त्यांची भेट घेतली. यावेळी वेतन पथक अधीक्षक उदय सरनाईक होते. येथूनच आमदार जयंत आसगावकर यांनी पुणे शिक्षण विभागातील पवन जोशी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत पगार बिले फॉरवर्ड होताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. जोशी यांनी याबाबत सहकार्य केले.




