पन्हाळगडावरील शिवस्मारक परिसराच्या विकासासाठी अतिरिक्त १५ कोटींचा निधी मंजूर आमदार चंद्रदीप नरके यांच्या मागणीची तात्काळ दखल; एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळे पन्हाळगड शिवस्मारक विकासाला मिळणार गती

Spread the news

*पन्हाळगडावरील शिवस्मारक परिसराच्या विकासासाठी अतिरिक्त १५ कोटींचा निधी मंजूर*

­

 

*आमदार चंद्रदीप नरके यांच्या मागणीची तात्काळ दखल; एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळे पन्हाळगड शिवस्मारक विकासाला मिळणार गती*

  •  

कोल्हापूर, दि. २२ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक पन्हाळगड हा महाराष्ट्रासह देश-विदेशातील लाखो शिवभक्तांचे प्रेरणास्थान आहे. पन्हाळगडाच्या ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी पन्हाळा नगरपरिषद हद्दीतील ऐतिहासिक शिवतीर्थ तलाव परिसरातील शिवस्मारकाजवळ बगीचा, पदपथ व अनुषंगिक विकासकामांसाठी अतिरिक्त ₹ १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे.

आमदार चंद्रदीप नरके यांनी पन्हाळगडावरील शिवस्मारकाच्या विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून, विधानसभेतही भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी वेळोवेळी केली होती. विशेष म्हणजे, महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटकांसाठी ऐतिहासिक महत्त्व असलेला पन्हाळगड हा जागतिक वारसा यादीतील महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांपैकी एक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचे आणि प्रेरणास्थानाचे प्रतीक असलेल्या या गडावर महाराजांचे स्मारक किंवा पुतळा नसल्याची बाब आमदार चंद्रदीप नरके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून देत, त्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्याची मागणी केली.

त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. २५ मार्च २०२५ रोजीच तात्काळ शासन निर्णय काढून पन्हाळा शिवस्मारकासाठी ₹ १० कोटींचा निधी मंजूर केला होता. तसेच स्मारकाच्या कामाची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. पन्हाळगडावरील शिवस्मारक हे शिवभक्तांच्या श्रद्धेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. याच अनुषंगाने शिवस्मारकाजवळील बगीचा, पदपथ व अनुषंगिक कामांसाठी आणखी ₹ १५ कोटींचा निधी मंजूर झाला असून, आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

“पन्हाळगड हा केवळ कोल्हापूर किंवा महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा देणारे लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. शिवस्मारक आणि परिसराच्या विकासासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत ₹ १५ कोटींचा निधी मंजूर केला, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या कामांचे नियोजन करताना पन्हाळा नगरवासीय, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शिवभक्तांना विश्वासात घेऊनच पुढील नियोजन करण्यात येईल,” असे आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.

या निधी मंजुरीबद्दल आमदार चंद्रदीप नरके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार व्यक्त केले. तसेच या कामासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार धैर्यशील माने यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. नगर विकास विभागाचे उपसचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी तात्काळ शासन निर्णय काढल्याबद्दल त्यांचेही आभार आमदार नरके यांनी व्यक्त केले.

पन्हाळगडावरील शिवस्मारकाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार चंद्रदीप नरके आणि शिवस्मारकासाठी निधी कमी पडू न देण्याची भूमिका घेत तात्काळ निर्णय घेणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवभक्तांकडून आभार व्यक्त करण्यात येत असून, या निर्णयाचे स्वागत होत आहे.

पन्हाळगडाच्या विकासासाठी यापूर्वी मंजूर झालेल्या ₹ १० कोटींच्या निधीनंतर आता आणखी ₹ १५ कोटींची भरीव तरतूद झाल्याने शिवस्मारक व परिसराच्या विकासासाठी एकूण ₹ २५ कोटींच्या निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पन्हाळगडाच्या विकासाला नवी दिशा मिळण्यासोबतच शिवभक्तांच्या सुविधांमध्येही मोठी वाढ होणार आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!