रविवारी होणाऱ्या विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट

Spread the news

*रविवारी होणाऱ्या विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या अनुषंगाने*
*वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट*

­

 

कोल्हापूर दि. 7 (जिमाका): संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ऑगस्ट 2024 रोजी दुर्दैवाने आग लागली आणि ते आगीच्या भक्षस्थानी पडले. संपूर्ण कला जगताच्या आणि जिल्हावासीयांच्या हृदयाला चटका लावणारी ही घटना होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती, आणि त्याच दिवशी त्यांनी घोषणा केली संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे पूर्वस्थितीसारखेच वैभव निर्माण केले जाईल.

  •  

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची दिमाखदार पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. याचे उद्घाटन रविवार, दिनांक 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवर मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मिरजकर, आदिल फरास उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पूर्वीपेक्षाही अधिक दिमाखदार स्वरूपात उभारण्यात आले आहे. रंगकर्मींच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न कोल्हापूर महानगरपालिका आणि शासनाने संयुक्तपणे केला आहे. रविवारी मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत या नाट्यगृहाचा पुन्हा पडदा उघडला जाईल आणि हे नाट्यगृह पूर्वीप्रमाणेच रंगकर्मींच्या सेवेत दाखल होईल.

ते पुढे म्हणाले की, नाट्यगृहाच्या उद्घाटनानंतर प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि जाहीर सभा होणार आहे. तसेच कागल येथे हिंदूराव घाडगे विद्यालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त करण्यात आलेल्या जीर्णोद्धार कामांचे उद्घाटन आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पणही याच दिवशी होणार आहे.
0000


Spread the news

You may also like

error: Content is protected !!